मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मायबाप प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. सोमवारी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यलयाजवळ मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेवून रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
मराठी अस्मिता जागी व्हावी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी प्रेक्षकांनी या भाषेतील कलाकृतींना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत असताना या होतकरू कलाकारांनी उचलेल्या पावलाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
सोमवारी २ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वाजता ही मंडळी गुडलक हॉटेल, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग, गुडलक चौकाजवळ, डेक्कन जिमखाना येथे चक्क फलक घेवून उभे असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. “आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…”, “आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता”, “मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडेदिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव यांच्या भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
आपल्या चित्रपटाबद्दलची त्यांची आत्मीयता त्यांच्या या कृतीतून झळकत होती. “मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. माझ्या भूमिका असलेल्या चित्रपटांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पण माध्यमांच्या भडीमारामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी होते की काय, अशी भिती वाटत आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा ‘हटके’ मार्ग अवलंबला,” असे उद्गार मृण्मयीने काढले.




