मुंबई-ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारलीही होती. मात्र बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील स्त्री पात्र तर प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर विजय चव्हाण यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटके प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.