मुंबई-मुलुंड येथील कालीदास नाट्यमंदीर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून नाट्यगृहाची योग्य प्रकारे देखभाल दुरूस्ती होत आहे. याधर्तीवर अथवा वेगळ्या पध्दतीने राज्यातील सर्व महारनगरपालिका व नगरपालिकांमधील नाट्यगृहांची दुरूस्ती व देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी आज संबंधीत सर्व महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्रातील सिने कलावंत, रंगमंच कलावंत आणि लोक कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुख सुविधा या विषायासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी कलाकार श्री.आदेश बांदेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज भोसले, कार्यवाहक श्री.सुशांत शेलार, संचालक सांस्कृतिककार्य संचालनालयाच्या श्रीमती मिनल जोगळेकर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, महानगरपालिका जालना नगरपालिका यांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नाट्यगृहातील सुख सुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्यात यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन नाट्यगृहांची देखभाल व दुरूस्ती करावी. सर्व नाट्यगृहातील स्वच्छतागृहात पाण्याची सोय करावी तसेच नाट्यगृहातील खिडक्या, जाळ्या, दारे, कचरापेटी, फरशी इ. दुरुस्ती करुन घ्यावेत, कलाकारांच्या कपडे बदलण्याच्या खोल्या स्वच्छ व सुरक्षित असाव्यात व याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश यावेळी उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी आज संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाट्यगृहात आपत्कालीन स्थितीत एखादी समस्या निर्माण झाली असल्यास अधिकाऱ्यांचा दुरध्वनी क्रमांक नाट्यगृहात दर्शनी भागात लावावा. असेही निर्देश दिले. सोशल मिडिया वरती किंवा मनपाच्या वेबसाईटवरती सर्व मनपांनी नाट्यगृहातील सोयी सुविधांची माहिती अपलोड करावी तदनंतर आवश्यक दुरूस्ती नंतरचे फोटो ही अपलोड करावेत. सर्व मनपांनी नाट्यगृह दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा व देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक तिथे महानगरपालिकेच्या सदस्यांची समिती स्थापन करावी. यामध्ये पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक कलाकार यांना प्रतिनिधित्व द्यावे.
नाट्यगृहामध्ये दिव्यांग व्यक्तींच्या साठी व्हिल चेअर व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई या नाट्यगृहाबाबतचा सविस्तर अहवाल सांस्कृतिक विभागाने सादर करावा असेही निर्देश देण्यात आले.
नाट्यगृहांची आवश्यक दुरूस्ती करून कलावंतांना पुरेश्या सुविधा १० ऑगस्ट पर्यंत देण्यात याव्यात… -नीलम गोऱ्हे यांचे महानगरपालिकांना निर्देश
Date: