फ्रायडे बंपर ओपनिंग, करंट बुकिंगसाठी प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा, प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्या असं जंगी स्वागत झालेल्या दगडी चाळ ची निर्मिती संस्था ‘मंगलमूर्ती फिल्म्स’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर डल्ला मारण्याच्या विचारात आहे…आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून येत्या जुलैमध्ये मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था नव्या चित्रपटाच्या शूटींगचा शुभारंभ करणार असल्याचे कळते.2 ऑक्टोबर 2015 मध्ये आलेल्या दगडी चाळ या चित्रपटात 1996 ची मुंबई…या मुंबईतील तेव्हांची
परिस्थिती याचे मनोरंजक चित्रण करण्यात आले होते. गँग्ज आणि गँगवॉर्सच्या चकाट्यात अडकलेली मुंबई आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत उमलत जाणारी प्रेमकथा यांचे मिश्रण दगडी चाळच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आले…संपूर्ण महाराष्ट्रात ही ‘दगडी चाळ’ प्रसिध्द झाली. यातल्या प्रत्येक रहिवाशावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. डॅडी आणि सूर्या दगडी चाळमधल्या या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाल्या…आणि आता प्रेक्षकांना उत्सूकता लागून राहिली आहे ती या चित्रपटाच्या सिक्वेलची…आता मंगलमूर्ती फिल्म्स तयारीला लागलेला चित्रपट हाच आहे?…की एक नवा गँगवॉर आपल्याला पाहायला मिळणार? की मंगलमूर्ती फिल्म्स यावेळेला विनोदी चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे? या चित्रपटातही अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि चंद्रकांत कणसे ही तिगडी आपल्याला पाहायला मिळणार? हे आणि असे अनेक प्रश्न एव्हाना आपल्या मनात डोकावून गेले असतील.