पुणे :
‘जागतिकीकरणाने निर्माण झालेले विकासाचे प्रश्न मांडण्याची सुवर्णसंधी मोर्चेकर्यांना मिळत असताना जातीय जाणीवा टोकदार करण्यापेक्षा वर्गीय लढा लढण्याची गरज आहे.’ असा सूर गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘जात, आरक्षण आणि अॅट्रोसिटी’या परिसंवादात उमटला.
गांधी सप्ताहनिमित्त आयोजित हा परिसंवाद ‘गांधी भवन’ कोथरूड येथे झाला. यात राजेंद्र कोंढरे, प्रा. डॉ. नितेश नवसागरे, प्रा. डॉ. प्रकाश पवार सहभागी झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.
राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘एरवी मोर्चांना 200 लोक येत नसत. मात्र, यावेळी लाखो जण मराठी क्रांती मोर्चाला आले. कारण विखुरला गेलेला समाज एकत्र आला. खदखद होती, ती बाहेर आली. आतापर्यंत मराठा व्यासपीठावर येण्याची, मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचा संकोच मराठा राजकारण्यांना तथाकथित पुरोगामीत्वामुळे वाटत होता. त्यामुळे मुलभूत प्रश्न दुर्लक्षित राहिले होते. माध्यमात पाटलाची प्रतिमा जी रंगवली गेली, तीच समाजाची प्रतिमा आहे, असे मानले गेले, मराठा समाजाच्या प्रगतीसाठी उद्योग, स्वयं रोजगार देणारी सरकारी संस्थाही स्थापन केली पाहिजे. सामाजिक समतेबरोबर आर्थिक समतेचीही गरज आहे.’
प्रा. नितेश नवसागरे म्हणाले, ‘सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाबाबत चर्चा कमी आणि कांगावा जास्त आहे. विकासाच्या मुलभूत प्रश्नाला हात घातला पाहिजे. कोपर्डीनंतर प्रकाश आंबेडकर, आठवले यांना कोपर्डीत येऊ न देणे ही चूक होती. हे लाखांचे मोर्चे वर्गीय प्रश्नाबद्दल न बोलता जातीय प्रश्नाबद्दल बोलत आहेत. अशावेळी जातीय अस्मिता टोकदार होणार असतील तर जातीअंताची संधी दवडली जाणार आहे.’
मूठभरांच्या हातात राज्याची सत्ता, सहकारी सत्ता का गेली. शिक्षणाचे बाजारीकरण कोणी केले. हे प्रश्नही मोर्चोकर्यांनी विचारले पाहिजेत.
प्रा. प्रकाश पवार म्हणाले, ‘प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याची मराठा समाजाची प्रक्रिया 1990 पासून सुरू झाली. आता मोर्चा मोठा झाला असला तरी, अजेंडा छोटा झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्यसंस्था द्विधा आहे. ‘कार्पोरेट स्टेटच्या उदयामुळे कृषी उद्योग संकटात आले. कौशल्याधारित प्रगती मराठा समाज करू शकला नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.’
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अहिंसक मोर्चाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘आर्थिक विकासाची मॉडेल्स अपयशी झाली. आता माणसा-माणसातील अंतर कमी करणारी क्रांती झाली पाहिजे. 31 घराण्यात एकवटलेली सत्ता, हे पाप नाही का? या पार्श्वभूमीवर मोर्चातून घडणार्या विचारमंथनातून अमृत बाहेर आले पाहिजे.’
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, अप्पा अनारसे यांनी आभार मानले.

