जात सोडून वैश्विकतेकडे जाण्याची गरज ः प्रा. मिलिंद आव्हाड
पुणे :
‘महापुरुषांची मांडणी जातींच्या महापुरुषात होत असताना जातीच्या जाणीवा टोकदार होत आहेत. महात्मा गांधींना ज्याप्रमाणे जातीच्या मांडणीत न अडकवता वैश्विकतेकडे जाता आले, तसेच जात सोडून वैश्विकतेकडे जाण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (दिल्ली) मधील प्रा. मिलिंद आव्हाड यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित 7 व्या महात्मा गांधी सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते.
प्रा. आव्हाड म्हणाले, समाजातील ओळखी (आयडेंटीटीज्) आज आकुंचित होत आहेत. विचार करू शकणारा वर्गच अभिजन होत आहे. मात्र, तळागाळाशी संवाद ठेवणार्या अभिजन वर्गाची भारताला गरज आहे.
जातग्रस्त बहुजन वाद येत असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘जातीय जाणीवा ठेवून जात तोडता येणार नाही. काही मतभेद असले तरी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची जात तोडण्याची धारणा समान होती. जाती अंताची लढाई लढताना शास्त्रीयता आणि संवेदनशीलतेचे फ्युजन घेऊन वैश्विक व्हावे, असे ते म्हणाले.’
ते पुढे म्हणाले, ‘जात आणि व्यवसाय याचे नाते तुटले की, नवे पंख येतात, हे सध्या जाणवत आहे. जात ही जाते आहे. मात्र, जाताना थोडा आवाज करते आहे. अशा वेळी जातनिर्मूलन खेड्यांचा उद्धार, धार्मिक ऐक्य आणि शंभर टक्के अर्थार्जनाची संधी यातून राष्ट्र उभे राहील.’
यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना झाली. त्यात पं. वसंत गाडगीळ, संतासिंग मोखा, चित्रलेखा जेम्स आणि भंते ज्युमेद मोही यांनी भाग घेतला. व्यासपीठावर विश्वस्त अभय छाजेड, अन्वर राजन, संदीप बर्वे, अप्पा अनारसे, डॉ. सुलभा शहा, तोडणकर गुरुजी उपस्थित होते.
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुताचा हार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘चंद्रशेखर’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाबाबत डॉ. अंजली सोमन यांनी मनोगत व्यक्त केले.
शांती मार्च ला उत्स्फूर्त प्रतिसाद
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित शांतता मार्चला रविवार सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, महिला, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थेंचे प्रतिनिधी सहभागी झाले. पं. वसंत गाडगीळ यांनी गांधी प्रार्थना सांगितली. महात्मा गांधी आणि पुण्याच्या ऋणानुबंधाच्या आठवणी सांगितल्या. यावेळी अन्वर राजन, संदीप बर्वे, अप्पा अनारसे, भारतीय एकात्मता संघटनाचे ईस्माईल शेख, चित्रलेखा जेम्स उपस्थित होते. ‘शांती मार्च’ चा मार्ग सेनापती बापट पुतळा, अलका चौक, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, सीटी पोस्ट मार्गे शनिवार वाडा असा होता. शनिवार वाडा येथे समारोप झाला.’