पुणे-महाराष्ट्रातील पारंपारिक सणांची महती आणि माहती दृकश्राव्य तसेच नृत्य व संगीत या द्वारे सादर करणारा विलोभनीय कार्यक्रम ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये, बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. कालच्या संस्कारांना आजच्या तांत्रिक माध्यमाद्वारे उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचविणारी ही कलाकृती होती.
स्वरांश एंटरटेंमेंट निर्मित व प्रभा एंटरप्राइजेस संयोजित- महाराष्ट्रची सणयात्रा आपल्याला भगवान राम-कृष्ण, ज्ञानोबा-तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक कालखंडांची सैर करून त्या कालखंडाशी आणि परंपरेशी एकरूप करते. ही यात्रा निसर्गाचे महत्व सांगते तसेच स्त्रीपूजेचे. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मराठी सणांवर आधारित सुमधुर गाणी, नेत्रदीपक नृत्य, माहितीपर संहिता, आणि ह्या सगळ्या धाग्याची एक सुरेल वीण असलेला नाट्यमय सूत्र-संचलन.
नूतन वर्षारंभ म्हणजे गुढी पाडव्यापासून सुरु होणारी ही यात्रा, पुढे रामनवमी, अक्षय्य तृतिया, मंगळागौर, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, शिवजयंती ते अगदी महिला दिन अशा व इतर अनेक सण-समारंभांना स्पर्श करत महाराष्ट्राचे नखशिखांत दर्शन घडवून आणते. गाण्यांना आणि सणांना अनुसरून केलेले पोशाख, कार्यक्रमाला साजेशी रंगमंच सजावट आपल्याला केवळ कार्यक्रमाच्या कालावधीपुरते नाही तर पुढे देखील त्या भावविश्वात रमवून ठेवते.
याची संकल्पना व दिग्दर्शन शैलेश लेले यांची असून, संहिता व सूत्र संचालन रवींद्र खरे यांनी केली आहे. याचे सर्जनशील दिग्दर्शन कौस्तुभ देशपांडे यांनी केले असून गायक प्रणाली काळे, हरिष वांगीकर, मोहित थत्ते, श्रुती देवस्थळी, केदार जोग, सिद्धिदा गोडबोले हे आहेत. ऋतुजा पवार, प्रसाद ओझरकर, सिद्धांत हिंगमिरे, गौरी देशपांडे यांनी नृत्य सादर करून कार्यक्रम अधिक दर्जेदार बनवला.
ध्वनी योजना प्रशांत उरुणकर यांची असून नेपथ्य उपेंद्र इंगळीकर, प्रकाश योजना: तेजस देवधर व शुभम परदेशी आणि प्रोजेक्शन गणेश धुमाळ यांची आहे.