मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील कला क्षेत्रात मोठे योगदान असणारे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या नावाने राज्यातील कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी ” महाराष्ट्र कलाकार मंडळ ” स्थापन करावे.अशी मागणी जेष्ठ पत्रकार आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून येथे जातपात-पंथ यापलीकडे कलाकार रसिकांची सेवा करीत आहे.येथील प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये लोककलावंताचा सहभाग असल्याशिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही.यामुळे कलाकारांना तेवढीच सामाजिक सुरक्षा कवच गरजेचे आहे.कोविड १९ नंतर कलावंताची अवस्था बिकट झाली आहे.असंघटीत क्षेत्र असलेल्या कलाकारांना किमान वेतन आयोगाचा कायदा लागू नाही.त्यांची कोणती विमा पॉलिसी नाही.त्यांना कार्यक्रम उभारणीसाठी कर्ज उपलब्ध होत नाही.त्यांच्या मुला -मुलींसाठी मोफत शिक्षण अथवा प्रशिक्षणाची योजना नाहीत.त्यामुळे या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने तातडीने स्व. विलासराव देशमुख यांच्या नावाने “महाराष्ट्र कलाकार मंडळा”ची निर्मिती करून राज्यातील कलाकारांना आधार दयावा. असेही श्री.गायकवाड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान आहे.हे कोणी नाकारू शकत नाही. सांस्कृतिक कार्य मंत्र्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी कलाकारांना भर भरून दिले. आपल्यात आणि कलाकारांमध्ये त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही.अखेरच्या श्वासापर्यत विलासरावांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले.त्यामुळे त्यांच्या नावाने तातडीने महाराष्ट्र कलाकार मंडळ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळात अधिकृत प्रस्ताव आणून निर्णय घ्यावा.अशी सूचनाही जेष्ठ पत्रकार आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना केली आहे.
स्व.विलासराव देशमुख यांच्या नावाने महाराष्ट्र कलाकार मंडळ स्थापन करावे.
Date:

