मिलिन्द सबनीस लिखित ‘कहाणी वन्दे मातरम्’ची पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : इंग्रज राजवटीत भारत देशाविषयीच्या चुकीच्या आणि वाईट समजुती पसरविल्या गेल्या. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान राष्ट्रवाद दाखविण्यासाठी तसेच भारत भूमी आपली माता आहे, या भावनेतून बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम्ची रचना केली. वंदे मातरम् हे केवळ गीतच नव्हे तर स्वातंत्र्य युद्धकाळातील मंत्र होता, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, ब्रॅण्डिंग तज्ज्ञ अभिजित जोग यांनी केले.
वंदे मातरम् सार्थ शति (150व्या) वर्षानिमित्त वंदे मातरम्चे अभ्यासक, लेखक, चित्रकार मिलिन्द प्रभाकर सबनीस लिखित ‘कहाणी वन्दे मातरम्’ची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 9) आबासाहेब अत्रे दिन प्रशालेतील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्षात आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते झाले. त्या वेळी अभिजीत जोग अध्यक्षपदावरून बोलत होते. चित्रकार चंद्रशेखर जोशी, अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण सुपे, कार्यक्रमाचे संयोजक संदर्भ ग्रंथपाल आणि माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे, शिल्पा सबनीस, प्रसाद कुलकर्णी, सुवासिनी जोशी, पियूष शहा, उत्तम साळवे उपस्थित होते. वंदे मातरम् या गीताविषयीचे चित्ररूपी प्रदर्शन वाचनकक्षात भरविण्यात आले आहे.
ग्रंथ हे गुरूच नव्हे तर मित्रही असतात, असे सांगून जोग पुढे म्हणाले, वंद मातरम् गीताच्या 150व्या वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वंदे मातरम् या गीताचा इतिहास ‘कहाणी वन्दे मातरम्’ची या चित्रकथारूपी पुस्तकाद्वारे माहित होणार आहे. अतिशय सोप्या भाषेत चित्रांसहित निर्मित केलेले हे पुस्तक देशभरात पोहोचणार असून शाळेतील वाचनालये, ग्रंथालये यांचा ठेवा बनणार आहे. वाचनातून आनंद घ्या, ज्ञान वाढवा, ज्या योगे तुमचा व्यक्तीमत्त्व विकास होईल, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जोग म्हणाले.
मिलिन्द सबनीस म्हणाले, शाळेने विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे या विषयी आनंद आहे. पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना ते म्हणाले, भारताचा इतिहास घडविण्यात आणि बदलण्यात वंदे मातरम् या गीताचा मोठा वाटा आहे. या गीताविषयीचा इतिहास चित्रकथारूपाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा याकरिता या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पुस्तक भारतातील 12 भाषांमध्ये भाषांतरीत होऊन त्या-त्या प्रांतातील विद्यार्थ्यांनाही वंदे मातरम्ची महती समजणार आहे. चित्रकथारूपी पुस्तके वाचताना मुलांना गोष्टीचे अकलन लवकर होते. चित्रांपासून पुढे जात जात विद्यार्थ्यांनी गोष्टीतील आषयाकडे वळावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविका प्रसाद भडसावळे म्हणाले, स्व. प्रभाताई अत्रे यांना वंदे मातरम् या गीताविषयी जिव्हाळा होता. त्यांचा प्रथम स्मृतिदिन, वंदे मातरम् गीताचे 150वे वर्ष आणि सध्या सुरू असलेला वाचन पंधरवडा याचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय केशव तळेकर यांनी करून दिला.