परभणी- धनंजय देशमुख हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना धमकी देण्यात आली. मात्र, यापुढे त्यांच्या कुटुंबीयांना आणि धनंजय देशमुखांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने देखील फिरु देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आजपर्यंत आम्ही त्यांचे नाव देखील घेतले नाही. मात्र देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर एकाला देखील रस्त्याने फिरू देणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या पुढच्या काळात लोकांना त्रास दिला तर परभणी जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा, त्यांना फिरु देणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. परभणीमध्ये आयोजित सर्वपक्षीय मूक मोर्चात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आम्हाला माज किंवा मस्ती नाही. मात्र जर आमची लेकरे उघड्यावर पडत असतील तर आम्ही थांबणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात नेमके कोणी सांभाळले? सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारमधील मंत्रीच आरोपींना सांभाळत असल्याचे दिसते, असा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.
आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. हे नवीन षडयंत्र असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मात्र, यातील एकही आरोपी बाहेर आला तर सरकारला सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आमच्या समाजावर अन्याय होत असेल तर आम्हाला त्यांना घरात घुसून बाहेर काढावे लागणार आहे. आता आमच्या समोर दुसरा कोणताच मार्ग नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सहन करायची देखील एक सीमा असते. आपणच संयम का ठेवायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समाजावरती आणि माता माऊलींवर अन्याय होत असेल तर जशाला तसे उत्तर द्यायचे, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.
संदीप क्षीरसागर, आणि सुरेश धस यांच्या भूमिकेवर देखील मनोज जरांगे यांनी विश्वास व्यक्त केला. याच नाही तर कोणत्याही पक्षाच्या आमदाराने आपली बाजू घेतली तर महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्या नेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.