पुणे दि. १ जानेवारी २०२५ : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असताना शहरामध्ये सर्सास त्याची विक्री केली जात आहे. हा मांजा काहींसाठी जीवघेणा ठरतोय तर काहींना यामुळे दुखापतीला सामोरे जावे लागत आहे. हे पाहता शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘राज्यशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालूनसुद्धा शहरात सर्वत्र राजरोसपणे त्याची विक्री होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे’, असं डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
नायलॉन मांजाच्या वापराने अनेक व्यक्ती जखमी झाले आहेत. पुणे शहरातील वारजे, कात्रज-कोंढवा आणि धनकवडी या परिसरात मागील आठवड्यात अशाच तीन गंभीर घटना घडल्या. एका व्यक्तीच्या गळ्याला १५ टाके पडले आहेत तर, एकाच्या डोळ्याला इजा झाल्याचे मला समजले. तसेच, आता मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरही मांजाचा वापर अधिक वाढेल हे स्पष्ट आहे. मुख्यत: नायलॉन मांजा हा चीन व काही दक्षिण पूर्व आशियाई देशातून आयात केला जातो व काही प्रमाणात राज्यात विविक्षित ठिकाणी त्याचे अवैध्यपणे उत्पादन/ निर्मिती केली जाते. अशापद्धतीने आयातीत व घरगुती उत्पादीत मांजाचा साठा मुख्य विक्रेते, घाऊक विक्रेत्यांकडून शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत पोहोचतो.
तात्पर्य, नायलॉन मांजाच्या वापराला प्रतिरोध करणे व त्याच्या निर्मितीवर संपूर्णपणे आळा घालण्याकरिता नायलॉन मांजा आयात करणारे/ निर्मिती, उत्पादन करणारे व्यापारी ते शेवटचा वापरकर्ता ही संपूर्ण साखळी मोडीत काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
मांजा आयात करणारे, निर्मिती / उत्पादन करणारे व्यापारी शोधावे व त्यांच्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढ़ळल्यास अथवा त्यांच्याकडून नायलॉन मांजाच्या वापरास उत्तेजन दिले जात असल्यास त्यांच्यावर पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ अंतर्गत तत्काळ कार्यवाही करावी. मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उड़विण्याचे प्रमाण सर्वाधिक असते व त्यात मांजाचा वापर प्रकर्षाने होतो. सबब, पुणे शहर व राज्यात जिथे कुठे पतंगबाजी होईल तेथे मांजाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी व त्याचा वापर करणारे सर्व व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी.
नायलॉन मांजाचा वापर हा कायदेशीर गुन्हा असुन त्यामुळे पर्यावरणास हानी पोहचते व वन्यजीव व मानवाच्या जीवीतास धोका पोहोचतो याबाबीचे आपल्या स्तरावरुण सर्वत्र प्रचार, प्रसार करण्यात यावे. वस्तुतः नायलॉन मांजाच्या वापरास अटकाव व बंदी यकरीता घ्यावयाची दक्षता हा एका दिवसाचा सोपस्कार नसुन ती अव्याहतपणे चालणारी प्रक्रीया आहे. करीता, यास्तव आपण एक सर्वसमावेशक कार्यप्रणाली बनवुन त्याची महानगरपालिका, जिल्हापरिषद व स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय साधून योग्यपद्धतीने अंमलबजावणी करावी.