पुणे-पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनाचा उत्साह मंगळवारपासूनच सुरू झाला आहे. दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी परराज्यातून तसेच राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात. यंदाही ३१ डिसेंबरपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी सुरू झाली. आज लाखोंच्या संख्येने येथे अनुयायी दाखल झाले आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थंभाला अभिवादन केले. या नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना एक कविता देखील सादर केली.
भिमा कोरोगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा,
उंच होतो आमचा माथा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता आणि
जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा
कोरेगाव स्तंभाला मी सलाम करतो जाता जाता
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जयस्तंभास अभिवादन केले. भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या – एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.