निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‘खोल मनाच्या तळाशी’ कवितासंग्रहाचे प्रका
पुणे : “सरकारी नोकरी दीर्घकाळ करूनही ज्यांनी संवेदनशीलता जपली आहे, असे वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या कविता म्हणजे मनाचा व नात्यांचा शोध घेणाऱ्या आहेत”, असे उद्गार यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि लेखक शेखर गायकवाड यांनी येथे काढले.
निमित्त होते निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‘खोल मनाच्या तळाशी’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचे. गायकवाड यांच्यासह बालभारतीचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन वनभवन, गोखलेनगर येथील सभागृहात झाले. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील, कवी रामदास पुजारी, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे, पुजारी यांच्या परिवारातील सदस्य व्यासपीठावर होते. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे व कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन. आर. प्रवीण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शेखर गायकवाड म्हणाले, पुजारी यांनी वनविभागातील सरकारी नोकरी करत असताना कवितासंग्रहांचे प्रकाशन करून सरकारी विभागातील रूक्षता स्वतःमध्ये येऊ दिली नाही. गणितासारखा विषय, वनविभागातील जबाबदारी, फिरत्या स्वीकारूनही त्यांनी संवेदनशीलता जपली आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या अनेकांनी लिहिते राहिले पाहिजे आणि वेगळे अनुभवविश्व मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे माझे सांगणे आहे. पुजारी यांनी कवितासंग्रहाचे प्रकाशन करून ते सिद्ध केले आहे, हे उल्लेखनीय आहे.
डॉ. कृष्णकुमार पाटील म्हणाले, बालभारती प्रत्येक घरातला घटक आहे. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार आणि वाचन आदर्श उभे करण्याचा प्रयत्न अभ्यासमंडळे करत असतात. पुजारी यांच्या कवितेतही संस्कार करण्याचे सामर्थ्य दिसते.
डॉ. शेषराव पाटील म्हणाले, पुजारी यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे कष्ट मांडले आहेत. तसेच नात्यांविषयी भाष्य केले आहे. त्यांचे भावविश्व उलगडणाऱ्या या कविता आहेत.
पुजारी यांनी निवृत्त झाल्यावर न थांबता दुसरी खेळी जणु सुरू केली आहे. त्यांच्यातील शिक्षक पुन्हा कार्यरत झाला आहे आणि कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीही लिहिता झाला आहे, हे विशेष वाटते. त्यांनी यापुढेही लिहीत राहावे, अशा शब्दांत एन. आर. प्रवीण यांनी अध्यक्षीय समारोप केला.
मनोगत मांडताना कवी रामदास पुजारी यांनी आपली जडणघडण, संस्कार करणारे गुरूजन, कुटुंबीय, स्नेही आणि संघर्षाचे दिवस उलगडले. आई, वडील, गुरू हे श्रद्धेचे तर शेतकरी, निसर्ग, वृक्ष हे सारे जिव्हाळ्याचे विषय आहेत. नात्यांविषयीचे कुतूहल जागे असल्याने नात्याविषय़ीच्या कविता लिहिल्या गेल्या तर काही कविता प्रसंगानुरूप सुचत गेल्या, असे ते म्हणाले.
साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे यांनी आभार मानले तर अनिता देशपांडे व सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.