तालायनच्या मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद
पुणे ता.२९: आपल्या गतिमान तबला वादनशैलीमुळे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजविणारे पं. सुखविंदर सिंह नामधारी (पिंकी) आणि बनारस घराण्याची कला समर्थपणे पुढे नेणारे पं. अरविंदकुमार आझाद या दोन दिग्गज गुरुबंधूंच्या सहवादनाने रसिकांना काल मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते तालायन म्युझिक सर्कलतर्फे तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज आणि पद्मभूषण पं. सी आर व्यास आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ झालेल्या श्रद्धा सुमन मैफिलीचे. तबलाही तालाच्या भाषेत किती सुरेल अन् तितकाच अवखळ संवाद साधू शकतो, याची विलक्षण प्रचिती जणू काल रसिकांना आली. वा उस्ताद.. वा.. बहोत खूब.. अशी रसिकांची उत्स्फूर्त दाद त्यांच्या प्रत्येक प्रस्तुतीला लाभली.
मैफिलीची सुरुवात सुखविंदर सिंह नामधारी यांचे शिष्य जसमीत चाना यांच्या एकल तबला वादनाने झाली. कॅनडास्थित चाना यांनी पुण्यात प्रथमच आपली कला सादर केली. परंपरेनुसार, कायदा, रेला, चक्रदार, पंजाबी तोडा आदी रचना अत्यंत तयारीने त्यांनी पेश केल्या. डग्गा-तबल्याचा योग्य समतोल, नेटके सादरीकरण यातून गुरुकडून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा एक सुंदर आविष्कार त्यांनी रसिकांसमोर मांडला. बनारस घराण्याचे संस्थापक पं. राम सहायजी, पं. किशन महाराज, पं. कंठे महाराज यांच्या रचना सादर करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांना सुधीर टेकाळे(संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली. त्यानंतर पं. सुहास व्यास यांचे सुमधूर गायन झाले. त्यांनी राग ‘मारवा’ सादर केला. ‘गुरुजन बिन’ ही ख्याल पेश करत त्यांनी आपल्या घराण्याच्या गायकीचे सौंदर्य उलगडले. प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांनी पं. किशन महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक कलाकाराने इतर कलावंतांचा तसेच त्यांच्या कलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यमन रागातील झपताल प्रस्तुत करत त्यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. त्यांची खुली व भावपूर्ण गायन शैली रसिकांना भावली. त्यांना माधव लिमये (संवादिनी), आदित्य देशमुख (तबला), आनंद बेंद्रे आणि केदार केळकर (तानपुरा) यांची सुरेल साथ लाभली. पं. राजन साजन मिश्रा यांचे सुपूत्र आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.रितेश मिश्रा व पं. रजनीश मिश्रा देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. सुखविंदर सिंह नामधारी (पिंकी) आणि पं. अरविंदकुमार आझाद यांचे सहवादन झाले. त्यांनी तीन ताल प्रस्तुत केला. त्यांच्या विलंबित, मध्य आणि द्रुत लयीच्या बहारदार प्रस्तुतीने रसिकांना खिळवून ठेवले. संवादिनी आणि सारंगीच्या मंजूळ सुरावटींशी लय साधत या दोन दिग्गजांची तबल्यावर थिरकणारी जादूई बोटे वादकांच्या दीर्घ रियाजाची साक्ष देऊन गेली. प्रत्येक तालातील ध्वनी तरंगांनी कधी रोमांच उभा केला तर कधी हळूवारपणे रसिकांच्या मनाला साद घातली. त्यांनी प्रथमच केलेले सहवादन ही रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरली. संदीप मिश्रा (सारंगी), सुधीर टेकाळे (संवादिनी) त्यांना समर्पक साथ दिली.
नि:शब्द करणारे सादरीकरण: पं. रितेश-पं. रजनीश मिश्राआपला नियोजित कार्यक्रम लवकर आटपून पं. सुखविंदर सिंह आणि पं. अरविंदकुमार आझाद यांचे सहवादन ऐकण्याच्या उत्कंठेने पं. रितेश मिश्रा व पं रजनीश मिश्रा सभागृहात आले. त्यांचे सहवादन पूर्ण होताच दोन्हीही बंधूंनी रंगमंचावर जाऊन त्यांची भेट घेतली. तुमच्या सादरीकरणाने आम्हाला नि:शब्द केले आहे, अशी दाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या.