बीड – सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीकडून तपास सुरू आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या गुन्हेगारीच्या विरोधात सत्यशोधक आंदोलन सुरू केले आहे. अंजली दमानिया यांनी सातत्याने वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवला असून त्यांना अटक करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांचा एक व्हिडिओ ट्विट करत संतोष देशमुख याला मारहाण होताना कोणत्या बड्या नेत्याचा फोन आला होता अशी विचारणा करत तात्काळ नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हणतात, संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी केलेल्या या ट्विटमुळे तपासाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच बीड पोलिस, सीआयडी तसेच राजकीय नेते या बड्या नेत्याचे नाव जाहीर करणार का? तसेच फोन कोणी केला होता याची माहिती पोलिस शोधून काढणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करावी, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार का? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

