पुणे – दिनांक १७ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी दुपारी ०२•३९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथे दुकानामध्ये आग लागल्याची वर्दि मिळताच तातडीने कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.
सदर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असणारया कपड्याच्या दोन दुकानामधून आग लागल्याचे दिसून येताच पाण्याचा मारा सुरु करत आग वरील मजल्यावर व इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत वरील मजल्यावर रहिवाशी असलेल्या पाच महिला व एक लहान मुलगा वय वर्ष ३ यांना श्वसन यंञ (बी ए सेट) परिधान करीत आग व धुरामधून बाहेर काढले व पुढे सुमारे वीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. आगीमध्ये कपडे, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, यंञसामुग्री इत्यादी जळाले असून मोठे नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये एका महिलेच्या पायाला व दलाचे जवान यांच्या हाताला किरकोळ स्वरूपात भाजले आहे.
सदर घटनास्थळी आज लहान मुलाचा वाढदिवस असताना त्याची दलाच्या जवानांनी केलेली सुखरुप सुटका याबद्दल स्थानिकांनी जवानांचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते,हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी सहभाग घेतला.