नवी दिल्ली-जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी याला दुजोरा दिला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हुसेन हे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसने ग्रस्त होते.गेल्या दोन आठवड्यांपासून ते सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
झाकीर यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लारखा कुरेशी आणि आईचे नाव बावी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्लारखा हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले.
मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केले. हुसेन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.हुसेन यांना 2009 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. 2024 मध्ये त्यांनी 3 वेगवेगळ्या अल्बमसाठी 3 ग्रॅमी जिंकले. अशा प्रकारे झाकीर हुसेन यांनी एकूण 4 ग्रॅमी पुरस्कार जिंकले.

