मुंबई, १३ डिसेंबर २०२४ –
ललित दोशी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने ३०वे ललित दोशी स्मृती व्याख्यान मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात पार पडले. १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या व्याख्यानमालेत हे शेवटचे व्याख्यान होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयसीआयसीआय बँकेचे माजी अध्यक्ष के.व्ही. कामत व सीएनबसी टीव्ही १८च्या व्यवस्थापकीय संपादिका शेरीन भान यांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ‘भारताची पंच्याहत्तरी आणि शंभरी-पुढचा प्रवास’ या मूळ संकल्पनेवर आधारित भारताचा १९९० च्या प्रारंभापासून ते २०४७ पर्यंतचा अपेक्षित प्रवास या विचारांवर तज्ज्ञांनी आपापली मते मांडली.
आपल्या व्यावसायिक करिअरमधील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभवांच्या आधारावर के.व्ही.कामत यांनी देशाच्या आर्थिक उत्क्रांतीबद्दल तपशीलवार माहिती दिली. १९९०च्या सुरुवातीला देशात बदलांचे वारे वाहू लागले होते. त्याच वेळी आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना होऊ लागली होती. उदारीकरण आणि तंत्रज्ञानाचा सढळ हस्ते वापर करत, देशात पायाभूत सोईसुविधांची वाढ होत गेली. ही वाढ २००० सालीच्या सुरुवातीला तत्परतेने केली गेली, हा विचार त्यांनी मांडला. या काळात प्रगतीचा कालखंड लक्षात घेतल्यास विकास हा झपाट्याने घडत गेला. त्याच वेळी विविध प्रकल्पांच्या पायाउभारणीतील पर्यावरणीय नियमावलींच्या मर्यादा ते बाजारपेठेतील मंदीपर्यंत कामत यांनी चिंता व्यक्त केली. हे सर्व घटक भारताच्या आर्थिक विकासासमोरील मोठी आव्हाने असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
येत्या २५ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास विविध घटकांवर विकास करण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
० पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण – २००० साली पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली. आता या पायाभूत सुविधांच्या जोरावर सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढायला हवा. सौरऊर्जा किफायतशीर दरात उपलब्ध आहे, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी, असे ते म्हणाले. रस्ते आणि दूरसंचार सेवांमध्येही विकास घडविला, तर आर्थिक विकासाचा पाया स्थिर होईल, असेही त्यांनी सूचविले.
० औद्योगिक क्षेत्र आणि मालाच्या निर्मितीचा व्यवसाय वाढण्यावर भर – मालाचे उत्पादन बाजारात तत्काळ उपलब्ध करून द्यायला हवे. मालाच्या उत्पादनातील स्पर्धा वाढल्यास बाजारात असंख्य स्पर्धक निर्माण होतील. माल उत्पादन निर्मितीत मूल्य साखळी तयार झाल्यास रोजगारनिर्मितीला हातभार लागेल. भारत जागतिक बाजारपेठेत मालपुरवठा करणारे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.
० तांत्रिक झेप आणि डिजीटल भारत – १९९०च्या सुरुवातीला मोबाइल तंत्रज्ञानाचे भारतात आगमन झाले. त्यानंतर, भक्कम फिनटेक प्रणालीचा विकास घडला. तंत्रज्ञान आणि डिजिटल उद्योगाच्या विकासामुळे जलद गतीने विकास घडला. याबद्दलही कामत यांनी आपले विचार मांडले. येत्या दशकांत डिजिटल माध्यमांतील उत्क्रांतीमुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात किमान दोन टक्क्यांनी वाढ होईल. परिणामी, दोन अंकी विस्ताराचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
० सामाजिकीकरण आणि ग्रामीण-शहरीकरणाचे एकत्रिकरण – कामत यांच्या मते, ग्रामीण भारताच्या समुद्धीने भविष्यातील प्रगतीचा पाया रचला जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण-शहरीकरणातील भेदभाव मिटविणे, कामाचा दर्जा वाढविणे, तसेच बाजारातील पुरवठा साखळी वाढविणे इत्यादी घटकांवर भर दिल्यास सर्वसमावेशक विकास घडविता येईल, तसेच न्याय वाढीला चालना मिळेल.
या सर्व मुद्द्यांसह विचारविनिमयाने केलेल्या वित्तीय योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित केल्यास येत्या २५ वर्षांत देशाच्या आर्थिक विकासात भरभराट होईल, असा दृढ विश्वास कामत यांनी व्यक्त केला. आर्थिक उलाढालीत कर्जदारीच्या प्रक्रियेत व्याजदर कमी राहिल्यास चलनवाढ नियंत्रणात राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. देशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्व वाढल्यास चलनवाढ नियंत्रणात आल्यास अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होईल. भारत आर्थिक महासत्ता म्हणून जगभरात ओळखला जाईल, असा सकारात्मक दृष्टिकोन कामत यांनी आपल्या भाषणातून दिला.
या व्याख्यानमालेला प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक, दीपक पारेख, राजदूत विजय नांबियार, डॉ.अशोक गांगुली, नादिर गोदरेज आणि आनंद महिंद्रा या नामवंत उद्योगपतींनी हजेरी लावली.
या व्याख्यानमालेत ललित दोशी मेमोरिअल फाउंडेशनचे विश्वस्त भरत दोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘यंदाच्या व्याख्यानमालेत भविष्यातील परिवर्तनवादी दृष्टिकोन मांडला गेला. हा परिवर्तनवादी दृष्टिकोन ललित दोशी यांच्या विचारांना प्रेरणा देणा-या भावनेशी सुसंगत आहे. हा परिवर्तनवादी विचार भारताचे धोरणकर्ते, उद्योगपती आणि नागरिकांना मार्गदर्शन करणारा ठरेल. आम्ही सर्व एकसंघिक होत पूर्ण विकसित देशाकडे वाटचाल करण्यास सज्ज आहोत.’’