१४ डिसेंबर ही भारताचे एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक स्व. राज कपूर ह्यांची जन्मतारीख. १९२४ मध्ये जन्मलेल्या स्व. राज कपूर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा पूर्णत्वास येत आहे.
आपले वडील म्हणजेच भारदस्त आणि दमदार अभिनेते स्व. पृथ्वीराज कपूर ह्यांच्याकडून राजकपूर यांना देखण्या रुपाचा आणि कसदार अभिनयाचा वारसा लाभला. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शोमन’ म्हणून ओळखले जायचे.
अतिशय कोवळ्या वयातच त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. प्रथम किदार शर्मा, भालजी पेंढारकर अशा सारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली उमेदवारी आणि नंतर आर. के. फिल्मस् ह्या संस्थेची स्थापना करून त्यांनी ‘आग’ ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आग, आह, आवारा, बरसात, जिस देश में गंगा बहती है, संगम, जागते रहो, प्रेमरोग, मेरा नाम जोकर, सत्यम् शिवम् सुंदरम्, राम तेरी गंगा मैली, हीना अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. त्यातल्या बहुतेकांचे दिग्दर्शन देखील केले.
आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता त्यातून काहीतरी सामाजिक संदेश दिला जाईल ह्याची खबरदारी घेतली.
लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच १९६४ साली राज कपूर ह्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी-काळभोर गावाच्या शिवारात राजबाग ह्या नावाने ओळखली जाणारी सुमारे १०० एकर जमीन एका पारशी व्यक्तीकडून विकत घेतली. मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेली अतिशय निसर्गरम्य अशी ही जमीन स्व. राज कपूर ह्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी इथे अनेक दर्जेदार चित्रपटांचे केवळ चित्रीकरणच केले नाही तर कितीतरी चित्रपटांचे ‘आयडिएशन’ व इतर निर्मितीपूर्वीच्या प्रक्रियादेखील ह्याच राजबागेत केल्या.
अशी ही सृजनशील व कलात्मक पार्श्वभूमी असलेली राजबाग २००२ साली एमआयटी, पुणे या सुप्रसिध्द शिक्षणसंस्थेच्या मालकीची झाली. ह्या पाठीमागचा इतिहास देखील रंजक आहे.
एमआयटी, पुणे शिक्षण संस्थेचे संस्थापक, दूरदृष्टी असलेले सुप्रसिध्द शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे मूळचे रामेश्वर (रूई) या मराठवाड्यातील छोट्या खेड्यातले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण करून ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. वारकरी संप्रदायाची जडणघडण असलेले प्रा. कराड सर हे अतिशय शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि सतत कामात गढलेले. १९८३ साली एमआयटी या शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर पूर्णपणे एमआयटीच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. तसेच विश्वात शांती संस्कृती स्थापित व्हावी या एकाच ध्यासाने पछाडलेले डॉ. कराड सर हे चित्रपट, नाटक अशासारख्या करमणूकीच्या साधनांपासून दूरच असायचे. सुमारे ३० ते ४० वर्षात त्यांनी चित्रपटगृहात पाऊल टाकले नव्हते.
अशी पार्श्वभूमी असलेल्या प्रा. डॉ. कराड सरांना एक दिवशी लोणी काळभोर येथील स्व. राज कपूर यांची राजबाग विकत घेण्याचा प्रस्ताव घेऊन एक परिचित त्यांचेकडे आले. राज कपूर यांचे १९८८ साली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती कृष्णा कपूर आणि रणधीर कपूर, ऋषी कपूर इ. त्यांच्या मुलांकडे जमिनीची मालकी होती. कराड सरांच्या बरोबर चर्चा करताना त्यांनी असे सांगितले की स्व. राजकपूर यांच्या मनात अशी तीव्र भावना होती की राजबागची ही जमीन देशाच्या नवीन व उज्ज्वल समाज घडविण्याच्या दृष्टीने एखाद्या शैक्षणिक संस्थेला देण्यात यावी. एमआयटी या संस्थेच्या वतीने कराड सरांनी त्यांना हमी दिली की सदरील जमीन ही पूर्णपणे शिक्षण आणि भारतीय ज्ञान संस्कृतीचे संवर्धन यासाठीच विकसित केली जाईल आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कार्य होणार नाही.
कराड सरांच्या या विधानाचा कपूर कुटुंबियांवर अतिशय प्रभाव पडला व त्यांनी राजबाग ही २००२ साली एमआयटी या संस्थेला विकली. जमीन विकत घेताना प्रा. कराड सरांच्या मनामध्ये तिथे सप्तरंग, सप्तसूर व सप्तऋषी या मूळ भारतीय संकल्पनेवर आधारित शिक्षण संस्थांची उभारणी करण्याचे मनात आले.
त्यानुसार त्यांनी विश्वशांती गुरुकुल, आयबी स्कूल, मॅनेट ही नौका अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था, विश्वशांती संगीत कला अकादमी ही स्व. लता मंगेशकरजी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली संगीत शिक्षणाची संस्था, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अशा अत्यंत दर्जेदार आणि वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या संस्थांची स्थापना करून मूळ राजबागेचे जणू रुपच पालटून टाकले.
आज राजबागला ‘विश्वराजबाग’ या अत्यंत अर्थपूर्ण नावाने ओळखले जाते. विश्वराजबाग ही भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी जागा आहे. तिथे आज एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या नावाने एक आंतरराष्ट्रीय स्तराचे विद्यापीठ कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठा असा विश्वशांतीला समर्पित घुमट तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या नावाने साकारला गेला आहे. भारताला ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारे महर्षी गौतम, महर्षी विश्वामित्र, महर्षी वशिष्ठ अशा अठरा ऋषींच्या नावाने उभारले गेलेले १८ आश्रम, पवित्र असे होमकुंड, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवन, श्री विश्वदर्शन देवता मंदिर अशा असंख्य वास्तूंनी विश्वराजबागेचे पावित्र्य खुलून आले आहे.
विशेष म्हणजे, स्व. राज कपूर यांची स्मृती जागती ठेवणारे ‘राज कपूर मेमोरिअल’ हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाला वाहिलेले एक विशाल संग्रहालय देखील प्रा. कराड सरांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहे, जे पर्यटकांचे एक विशेष आकर्षण ठरले आहे.
भारतीय सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणार्या कलाकारांचे पूर्णाकृती पुतळे आणि छायाचित्र यांनी सजवलेले हे राजकपूर मेमोरिअल म्हणजे स्व. राजकपूर यांना वाहिलेली एक भावपूर्ण श्रध्दांजलीच आहे.
आजपर्यंत बघितले गेले तर असेच दिसून येते की एकदा एखादी जागा विकत घेतल्यानंतर जुने मालक हे विस्मृतीत जातात. परंतु इथे कराड सरांनी स्व. राजकपूर यांच्या पवित्र स्मृतीला जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने इतके विशाल असे संग्रहालय उभारले आहे, हे विशेषच म्हणावे लागेल.