:सत्तेसोबत जायचे का नाही हे नेते ठरवतील, तरुणांना संघटनेत जबाबदारी द्यावी
पुणे-मूठ घट्ट असली की ताकद रहाते, आपण जर विखुरलेले राहू तर ताकद राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नवे उमदे जे आमदार निवडून आले आहे, त्यांना जर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष लवकर उभारू शकतो.
सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवारांनी काल जी शरद पवार यांची भेट दिली ती राजकीय नाही तर कौटुंबिक होती. हा केवळ कौटुंबिक प्रसंग आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट झाली ते नेहमीच होते, असे मला वाटते. ते केवळ शुभेच्छा देत आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते.सुनंदा पवार म्हणाल्या की, अजितदादा काही बोलले कुणाला भेटले, कुठे गेले तर त्यांची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमी सारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात, सर्वच कुटुंबामध्ये मतभेद असतात. मतभेद संपवून पुढे एकत्र येतील असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी 60 वर्षे राजकारण केले आहे. त्यांनी काय करावे यावर मी बोलू शकणार नाही.सुनंदा पवार म्हणाल्या की, जे तरुण आमदार निवडून आले आहे, त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना पक्षात जबाबदारी दिली तर हा पुन्हा चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. नव्या चेहऱ्यांना जर संधी दिली तर लवकर पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी फायदा होईल. रोहित पवारांना काय संधी द्यायची याबाबत सर्व अंतिम निर्णय शरद पवारांचा आहे.