ऋत्विक फाऊंडेशन आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, मॉडर्न कॉलेजतर्फे संवादात्मक मैफलीचे आयोजन
सरोद वादक केन झुकरमन यांच्याशी अनुपम जोशी साधणार संवाद
पुणे : स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. केन झुकरमन हे भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य आहेत.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, मॉर्डन कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रम शिवाजीनगर येथील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, मॉर्डन कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात होणार आहे, अशी माहिती ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील सुप्रसिद्ध युवा सरोद वादक अनुपम जोशी संवाद साधणार आहेत. वादन मैफलीत केन झुकरमन यांना महेशराज साळुंके तबलासाथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
केन झुकरमन यांनी भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांच्या मार्गदर्शनाखाली 37 वर्षे सरोद वादनाचे प्रशिक्षण घेतले असून केन यांनी भारतासह युरोप, अमेरिका येथील अनेक सांगीतिक मैफलींमध्ये गुरू उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत सरोद वादन केले आहे. अतिशय प्रगत आणि प्रगल्भ वादक म्हणून ओळख असणाऱ्या केन झुकरमन यांनी सरोद आणि तानपुरा यांच्यामधील पारंपरिक गियर्ड ट्यूनर्सचे एकत्रिकरण, सरोद या वाद्याचा आवाज आणि गुणवत्ता वाढविणारी अनोखी संरचना केली आहे. तसेच ‘शांती’ नामक उपकरणाद्वारे स्वयंचलित एकध्वनिक तानपुऱ्याची रचनाही केली आहे. केन झुकरमन हे गेल्या 39 वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिकचे संचालक असून उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत आणि मध्ययुगीन संगीताचे प्रशिक्षण देत आहेत.
सरोद वादक अनुपम जोशी हे पंडित राजीव तारानाथ आणि पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे शिष्य असून केन झुकरमन यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. अनुपम यांनी रुद्रवीणेच्या स्वरांजवळ जाणाऱ्या अनुमोहिनी वीणा या वाद्याची निर्मिती केली आहे. युवा पिढीतील तबलावादक महेशराज साळुंके यांनी पंडित उमेश मोघे तसेच पंडित नयन घोष यांच्याकडून तबला वादनाचे शिक्षण घेतले असून त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांना तबला साथ केली आहे.