मुंबई- लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतमनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली. आमच्याशिवाय सरकार येणार नाही, असे ते बोलले होते. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्या जागा निवडून येत नाही. राज ठाकरे युतीत येतील असे मला वाटत नाही. मी आहे तर त्यांची गरज काय? असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांना सोबत घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिम विरोधी भूमिका घेणे योग्य नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा, हिरवा रंग होता. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे. आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिम विरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तानला बळ देतात त्याच्या विरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत. योगीजी बोलले होते बटेंगे तो कटेंगे हा अर्थ असा की, मोदींना पाठिंबा देणारे एकत्र या, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

