राष्ट्रपतींना ईव्हीएमविरुद्ध पाठवली १० हजार पत्रे–निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाण्यात आंदोलन केले. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत दहा हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविली. मुख्य रस्त्यावर टेबल, खुर्ची आणि पोस्ट कार्ड ठेवण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला.
मुंबई-लाडक्या बहिणी, पैसे वाटप आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे मविआचा विधानसभेत पराभव झाला, असा दावा शरद पवारांनी केला आहे. लोकांनी मला सांगितले की, ईव्हीएम गुजरातमधून आले होते, असेही ते म्हणाले. ईव्हीएम सेट होते हे आधीच मला माहिती होते, असा दावा त्यांनी यापूर्वीच केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १० जागा मिळाल्या. शरद पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच एवढे मोठे अपयश मिळाले. या विषयी ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं. आमच्या विरोधकांनी असा प्रचार केला की जर सत्ता बदल झाला तर आम्ही लोक ही योजना बंद करू. त्यामुळे महिलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात मतदान केल्याचं वाटत आहे. याशिवाय राज्यात धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणं लावली गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येथे प्रचाराला आले होते. त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. त्यामुळे वेगळं वातावरण राज्यात निर्माण झालं. त्यानंतर एक है तो सेफ है चा नारा दिला. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. त्याचा परिणामही मतदारांवर झालेला दिसला. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढे पैशांचे वाटप या झाले. आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून ही बाब समोर येत आहे, असेही पवार म्हणाले.

