देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, संत-महंतांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास ४० हजार लोक येतील, असा अंदाज असला तरी ३० हजारांपेक्षा जास्त लोक बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. शपथविधीसाठी मुख्य मंच ८ हजार चौरस फुटांचा आहे. याशिवाय ४ हजार चौरस फुटांचे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या दहा हजार लाडक्या बहिणी शपथविधी सोहळ्याला येतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
मुंबईत शपथविधी सोहळ्याला व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० पोलिस उपायुक्त, २० सहायक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, १५० सहायक व पोलिस उपनिरीक्षकांसह १५०० पेक्षा अधिक पोलिस शपथविधी सोहळ्यावर नजर ठेवतील. ड्रोनद्वारेही नजर असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौक, हजारीमल सोमाणी मार्गावरील चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्ग, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोडदरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बंद राहणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाने कळवले आहे.
‘लाडकी बहीण कक्षात १० हजार महिला असतील. या लाडक्या बहिणी राज्याच्या विविध भागांतून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यातही ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिसणार असून त्यासाठी खास कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या ठिकाणी ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. तसेच शेतकरी, संविधान असे आणखी दोन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

