आज नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण दुःखी, नितीन गडकरी यांच्या विधानाची चर्चा
नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक विधानांसाठी कायमच चर्चेत असतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. नितीन गडकरी यांनी राजकारणाला ‘असंतुष्ट आत्म्यांचा महासागर’ अशी उपमा दिली आहे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती दु:खी असतो आणि नेहमीच सध्याच्या पदापेक्षा वरच्या पदाची आकांक्षा बाळगतो, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर येथे रविवारी ‘जीवनाचे 50 स्वर्णिय नियम’ या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर रोखठोक भाष्य केले. राजकारणात महत्त्वाकांक्षा कशी वाढली आहे, याची व्याख्याही त्यांनी केली.
नितीन गडकरी म्हणाले, राजकारण संतुष्ट आत्म्यांचा महासागर आहे. राजकारणात सर्वच लोक दु:खी आहेत. नगरसेवकाला नाराज असतो कारण त्याला आमदार होता नाही आले. एक आमदार यासाठी नाराज असतो कारण त्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्री दु:खी असतो कारण त्याला चांगले खाते भेटत नाही आणि ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. तर मुख्यमंत्री देखील तणावात असतो कारण पक्षश्रेष्ठी त्यांना कधी ठेवतील आणि बाजुला करतील याची त्याला भीती असते, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, जीवन आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ समजून घ्यावे लागेल.
नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक कोट आठवतो, ज्यात म्हटले आहे की, ‘माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही. जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो. नितीन गडकरी यांनी आनंदी जीवनासाठी चांगल्या मानवी मूल्यांवर आणि संस्कारांवर भर दिला. जीवन जगण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपले आदर्श आणि नियम सांगताना ‘व्यक्ती, पक्ष आणि पक्ष तत्त्वज्ञान’ याचे महत्त्व अधोरेखित केले.