भाजपचा शतप्रतिशतच्या दिशेने प्रवास
पुणे-काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. भाजप यावेळी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
रोहित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचा दावा केला. भाजपकडून यंदा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत. त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निश्चितच फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम केले आहे.रोहित पवार पवार पुढे म्हणाले, आपल्या पक्षातील कोणत्या आमदाराला मंत्रीपदासाठी संधी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्या – त्या पक्षाच्या प्रमुखाच असतो. पण या ठिकाणी सर्वकाही दिल्लीचे नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शतप्रतिशत भाजप या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे मंत्रीही सध्या भाजपचेच लोक ठरवताना दिसून येत आहेत.
रोहित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 88.06, तर महायुतीचा 81 टक्के होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच हा रेट 30 टक्क्यांच्या आसपास होता. भाजपने या निवडणुकीत 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. या निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. पण काही ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार करून विजय मिळवल्याचे दिसून येत आहे. विशेषतः भाजपचे उमेदवार असलेल्या जागेवर 10 टक्के, तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे उमेदवार उभे असलेल्या जागेवर 8 टक्के फेरफार झाल्याचा अंदाज आहे.
सोलापूरच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान-सोलापूरच्या एका गावात बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. त्यातून सत्य परिस्थिती पुढे येईल. अन्यही काही ठिकाणी भाजप उमेदवारांना एकसमान मतदान झाले आहे. हा केवळ योगायोग नाही. त्यात काहीतरी गडबड आहे. काँग्रेस ईव्हीएमच्या मुद्यावर आता पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांचा पक्षही या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेईल असे वाटते.