पुणे–निवडणुकीच्या दिवशी अखेरच्या दोन तासांची आकडेवारी आली आहे. ती आकडेवारी अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. यासंबंधी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपावर सखोल चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. एकत्रित बसून इंडिया आघाडीच्या आघाडी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हा विषय हातात घ्यावा, अशी चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच काहीतरी निर्णय होईल, असा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे.मला जे लोक भेटले त्या सर्वांना जयप्रकाश नारायण यांची आठवण आली. लोकांमधील असलेली अस्वस्थता पाहूनच बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारचा दिलासा मिळाला असल्याचे लोकांना वाटते. राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली. मात्र त्यांनी एकट्याने भूमिका घेणे हे योग्य नाही. या विरोधात जनतेने उठाव करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. असेच सुरू राहिले तर संसदीय पद्धती संपुष्ठात येईल, अशी चर्चा या ठिकाणी आज दिसत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आम्हाला आमचे मुद्दे मागण्यासाठी परवानगी दिली जात नाही. अशी एकही मागणी सत्ताधारी विरोधकांची मान्य करत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मागच्या सहा दिवसात संसदेच्या सभागृहात देशाच्या मुद्यावर एकही चर्चा होऊ शकली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचा हा देशावर आघात असल्याचा आरोप देखील पवार यांनी केला.
नागरिक जागृत आहेतच मात्र त्यांनी आता उठाव केला पाहिजे. अशी आज आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याची सुरुवात बाबा आढाव यांनी केली आहे. याचे पडसाद आगामी काळात दिसून येईल, असा मला विश्वास असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा पुरावा माझ्या हातात नाही. मात्र काही लोकांनी तसे दावे केले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या आधी देखील अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणूक आयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीची भूमिका घेईल असे आम्हाला वाटले नव्हते, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीनंतर आता यामध्ये तथ्य असल्याचे दिसते, असे देखील पवार म्हणाले. राज्यभरातील काही उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यातून काही पुढे येईल, याबद्दल माझ्या मनात शंका असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही, यावर देखील पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजच वाचले की पाच तारखेला सरकार तयार होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकांचे मत किंवा बहुमत या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. जे काही सुरू आहे हे राज्यकारभार करणारे ठरवतात, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून सरकार स्थापन झाले नसल्याच्या मुद्द्यावर देखील शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.