मुंबई-मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या टक्केवारी विषयी जनतेला देत असते, अशी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणताही पत्रकार परिषद घेतली नाही. रात्रीतून 76 लाख मतांची वाढ झाली. ही वाढ कशी झाली? असा सवाल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक आयोग सांगते. मतदान जास्त झाले असेल, तर त्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतील. निवडणूक आयोगाने त्या लागलेल्या लाईनचे आम्हाला व्हिडिओ द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच आयोगाने जी पारदर्शता पाळली पाहिजे ती पाळली नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद निवडणूक आयोगाने केली. तर रात्री 65. 2 टक्के मतदानाची नोंद आयोगाने केली. दुसऱ्या दिवशी 66 टक्के मतदाना झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 76 लाख मतांची वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी केला. मतदानाचे प्रमाण 7.50 टक्क्यांनी वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली. मतदानाच्या टक्केवारीत तफावत असून आम्ही यासंदर्भात कोर्टात जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
आम्ही ईव्हीएममशीनवर आरोप लावत असून आम्हाला लोकाशाही वाचवायची आहे. निवडणूक प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. आम्ही जर जिंकलो असतो तर त्यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित केले असते, असेही नाना पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची उत्तर द्यावीत. त्यांनी उत्तरे नाही दिल्यास आम्ही न्यायायलीन लढाई लढू तसेच प्रसंगी रस्त्यावर देखील उतरणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.
दरम्यान, विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.