२९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम सत्र
पुणे, दि.२७ नोव्हेंबर: “भारत देशातील कल्याणात्मक व मानव सुखकर ज्ञान कसे निर्माण झाले याचा सखोल अभ्यास होणे महत्वपूर्ण आहे. १४ विद्या आणि चार वेदांचा अभ्यासातूून असे आढळते की यातील ज्ञान हे मानवाला सुख, शांती आणि आध्यात्मिक दृष्या उन्नत करण्यासाठी आहे. जेव्हा मानवाचे मन शांत होईल तेव्हाच संपूर्ण विश्वात शांती नांदेल.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रो. सुखदेव द्विवेदी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम दिवसाच्या सत्रात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि वर्ल्ड पीस’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, प्रा.डॉ. प्रियंकर उपाध्याय व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रो.सुखदेव द्विवेदी म्हणाले,” संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला, परंतू जातांना त्यांनी जे ज्ञान दिले ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे आहे. वेदांचे ज्ञान, वैदीक ब्राम्हण, मीमांसा शास्त्र, न्याय शास्त्र, ब्रह्म शास्त्राचे ज्ञान वेळेनुसार आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऋषि मुनींच्या ज्ञानानुसार समाजात शांती स्थापन करण्याचे कार्य केले. नंतर चार वेदांचे ज्ञान समोर आले. चाणक्य निती मधील १७ अध्यक्ष आणि ५७२ सूत्र हे मानवाच्या सुखाचे आहेत. तसेच महाभारत आणि रामायणाचा मुख्य उद्देश्य शांतीचाच आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. मुकेश शर्मा यांनी ‘मिडिया आणि विश्वशांती’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, आजच्या युगात मोबाईल, फोन, टिव्हीची वाढती संख्या, सोशल मिडिया वाढत आहे. या माध्यमांना नियंत्रित करणे अतिशय अवघड झाले आहे. पुर्वीच्या काळात बदल घडून आता कार्यक्रम नंतर आणि मार्केट प्रथम आले आहे. अशावेळेस समाजाला काय दाखवायचे हे माध्यमांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे मानसिक शांती आवश्यक आहे.
त्यानंतर हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी ‘योग आणि अध्यात्म’ या विषयावर भाष्य केले. स्वतःला शोधणे म्हणजे योग असतो. ज्ञान आणि विज्ञान हे प्रात्यक्षित आहे आणि आत्मज्ञान हे अनुभूतीचे आहे. प्रामाणिकपणे जगणे म्हणजे अध्यात्म होय.
सूत्रसंचालन पराग खानविलकर आणि डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.