मुंबई-एकीकडे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावांना भरभरून मतदान केले असले तरी त्या स्वतः मात्र सत्तेपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले आहे महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे विधानसभेतील महिला आमदारांचे प्रमाण घटले आहे. यंदाच्या निवडणुकीत २१ महिला निवडून आल्या आहेत. यामध्ये १० विद्यमान महिला आमदारांचा समावेश आहे. २८८ सदस्यांच्या मागील विधानसभेत २७ महिला आमदार म्हणजेच फक्त ९.५ टक्के महिला आमदार होत्या. या वेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७.५ टक्क्यांवर आली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या एकमेव महिला आमदार आहेत.यंदा विधानसभेच्या निवडणुकीत ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात होते. त्यात पुरुष उमेदवारांची संख्या ३७७१, तर महिला उमेदवारांची संख्या ३६३ होती. निवडणुकीत तब्बल ३ कोटी ३ लाख महिलांनी मतदानात सहभाग घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर २२ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीत १२ विद्यमान महिला आमदांरापैकी १० महिला पुन्हा निवडून आल्या आहेत, तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि गीता जैन या दोन महिला आमदारांचा पराभव झाला आहे. नव्या पंधराव्या विधानसभेत १२ नवीन महिला असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटातून एकही महिला आमदार विजयी झालेल्या नाहीत.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने १८, शिंदे शिवसेनेकडून ८, अजित पवारच्या राष्ट्रवादीने ४ अशा ३१ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ११, काँग्रेसने ९, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० अशा महाविकास आघाडीने ३० महिलांना संधी दिली होती. त्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. म्हणजेच महायुती व मविआच्या ६० आमदारांमध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. तसेच इतर अपक्ष महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपने १२ महिला उमेदवारांना संधी दिली होती.
या आहेत राज्यातील नवीन २१ महिला आमदार
भाजप
श्वेता महाले (चिखली)
मेघना बोर्डीकार (जिंतूर)
देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
सीमा हिरे (नाशिक पश्चिम)
मंदा म्हात्रे (बेलापूर)
मनीषा चौधरी (दहिसर)
विद्या ठाकूर (गोरेगाव)
माधुरी मिसाळ (पर्वती)
मोनिका राजळे (शेवगाव)
नमिता मुंदडा (केज)
श्रीजया चव्हाण (भोकर)
सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)
स्नेहा पंडित (वसई)
अनुराधा चव्हाण (फुलंब्री)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
सुलभा खोडके (अमरावती)
सरोज अहिरे (देवळाली)
अदिती तटकरे (श्रीवर्धन)
ज्योती गायकवाड (धारावी)
सना मलिक (अनुशक्तीनगर)
शिवसेना शिंदे गट
मंजुळा गावित (साक्री)
संजना जाधव (कन्नड)
भाजपच्या ४ नवीन महिला आमदार
श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) भाजप, शिवसेनेच्या मंजुळा गावित (साक्री )आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला विजयी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिला विजयी झाल्या आहेत.