पुणे : दुभाजक उजेडात असावेत , त्यावर लाईट्स असावेत दुभाजकाची जाणीव वाहनचालकाला अगोदरच होईल अशी व्यवस्था असावी असे सारे नियम असतानाही पुण्यात एकाच रात्री दोन ठिकाणी भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकून अपघात झालेत. भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने एका घटनेत चालकाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
हर्षद दिपक बर्गे (वय २५, रा. मिलेटरी हौसिंग सोसायटी,सदर बाजार, सातारा) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र ऋषिकेश हेमंत धोत्रे (वय २६, रा. देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात कात्रजमधील मोरेबाग बसस्टॉपसमोर शनिवारी पहाटे अडीच वाजता घडला.
फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद बर्गे हे मोटारसायकलवरुन जात होते. बर्गे याने भरधाव मोटारसायकल चालविताना मोरेबाग बसस्टॉपसमोरील दुभाजकाला धडक दिली. त्यात ते रस्तावर पडल्याने दोघे जखमी झाले. हर्षद बर्गे याचा मृत्यु झाला असून ऋषिकेश धोत्रे हा जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.
दुसरी घटना कर्वे रोडवरील रांका ज्वेलर्ससमोरील उड्डाण पुलाच्या सुरुवातीला घडली. त्यात वैभव हनुमंत पिंपळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी, शिवनगर, संभाजीनगर, सातारा) हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल खारतोडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव पिंपळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजता भरधाव वेगाने कर्वे रोडवरुन जात होता.नळस्टॉपजवळील उड्डाणपुल सुरु होत असताना पुलाच्या कठड्याला दुचाकीची जोरात धडक दिली.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगिता गायकवाड तपास करीत आहे