पुणे- महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार हादरे दिलेल्या या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक हादरा पृथ्वीराज चव्हाणांसारख्या प्रामाणिक उत्तम नेत्याच्या पराभवाने बसला आहे एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हि पराभवाने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. एक्झिट पोल ची तर ऐशी तैशी नेहमीच होते पण या सारख्या बड्या नेत्यांच्या पराभवाने हे हादरे बसले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी विजय प्राप्त केला होता.
२०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांनी पराभव केला होता.यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील धक्कादायक पराभव झाला आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ आणि मनसेकडून योगेश सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला आहे. सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. मात्र आता हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातून गेला आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना १ लाख २५ हजार ३८० हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना ६३१२८ मते मिळाली होती. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आपला गड राखण्यात अपयश आले आहे.
यशोमती ठाकूर देखील तिवसा मतदार संघातून भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या पेक्षा ८१९५ मतांनी मागे राहिल्या आहेत. २३ पैकी २१ फेर्यांचे परिणाम आले तेव्हा हि स्थिती होती. अद्याप २ फेर्या बाकी होत्या.