असे निकाल महाराष्ट्रात लागणे शक्य नाही, हे मोठे कारस्थान ,भाजपने यंत्रणा ताब्यात घेतली
मुंबई-मोदी – शहा – फडणवीस यांनी काय दिवे लावले की ते 120 च्या पुढे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सध्याचा जो कौल आहे, याला कौल कसा म्हणावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा जनतेचा कौल नव्हता, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही ग्राउंडवर होतो, त्यामुळे आम्हाला जनतेचा कॉल माहिती होता. हे निकाल अदानी यांनी लावून घेतले आहेत. या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही माणणाऱ्या माणसाचा विश्वास बसूच शकत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये फक्त लाडकी बहीणच आहे का? राज्यात लाडके भाऊ, लाडके आजोबा, लाडके काका नाहीत का? त्यामुळे लाडक्या बहिणीचा हा परिणाम असल्याचे मला वाटत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड असल्याचा दावाही त्यांनी केला. गौतम अदानी यांचे महाराष्ट्राच्या निकालावर बारीक लक्ष होते. अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघाले आहे. हे अटक वॉरंट अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंवर होते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या निकालावर गौतम अदानी यांचा प्रभाव आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कारण अदानी तसेच फडणवीस आणि शिंदे हे वेगळे नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, याविषयी माझ्या मनात शंका नाही. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे निवडून येऊ शकतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्या गद्दारी विरोधात राज्यामध्ये रोष आहे. शरद पवारांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला. ते वादळ तुम्हाला दिसले नाही का? आज जागा जिंकल्यानंतर मीडिया युतीचे वादळ म्हणत असल्यावरुन त्यांनी टीका केली. त्यामुळे मीडियाने स्वतःला प्रश्न विचारावा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
लोकसभेचा निकाल देखील आम्ही मान्य केला नाही. नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला होता, असे आम्ही मानतो. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. मात्र यावेळी मोठे कारस्थान या निकालामागे मला दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला 75 जागा देखील देणार नसाल तर हा निकाल शहा – मोदी आणि अदानी यांनी मिळून लावला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात गौतम अदानी जिंकले असल्याचे त्यांना दाखवायचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपचे मन मोठे नाही तर कारस्थान मोठे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा महायुती सोबत जातील या बाबतीची शक्यता राऊत यांनी फेटाळून लावली आहे. भाजपने महाराष्ट्र विकायला काढला, त्याला आम्ही विरोध करत होतो. हा विरोध मोडून काढण्यासाठीच हा निकाल लावून घेतला असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. असे निकाल महाराष्ट्रात कधीच लागणे शक्य नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात लागलेला निकाल हा जनतेचा कौल नाही तर अदानी आणि त्यांच्या टोळीने लावून घेतलेला निकाल असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत 20 च्या वरती जागा मिळणार नाहीत, हा सर्वांचा अंदाज होता. हा भारतीय जनता पक्षाचा देखील अंदाज होता. भारतीय जनता पक्षाने आता यंत्रणा ताब्यात घेतली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.