जाहीरनाम्यात टँकरमुक्ती, सिग्नलमुक्ती, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण विकासाची ग्वाही
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे महायुतीचे वडगाव शेरी मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून वडगावशेरीचा चेहरा – मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये टँकरमुक्त मतदारसंघ, मेट्रोचे विस्तृत जाळे, सिग्नलमुक्त नगर रस्ता, महिला सक्षमीकरण, पब – बारवर बंदी, युवक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा संकल्प करण्यात आला असून वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही जाहीरनाम्याद्वारे आमदार टिंगरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप मतदार संघात कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात प्रचारफेरीच्या माध्यमातून केला. या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आमदार टिंगरे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यात मतदार संघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना हात घालण्यात आला असून सर्व घटकांसाठी विविध प्रकल्प आणि योजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवरायांचे विचार जनमाणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी पार्क, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग पूर्णपणे हटवून, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल उभारणी व मेट्रोचे विस्तारित जाळे याद्वारे नगर रस्ता सिग्नल मुक्त करणे, खराडी आयटी पार्कमध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती, खराडी, लोहगावसारख्या भागांना टँकरमुक्त करणे, मतदार संघातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजना, वैद्यकीय मदत केंद्र, मैदानांची उभारणी, विश्रांतवाडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, माजी सैनिकांसाठी सांस्कृतिक भवन, कोकण भवन, धानोरी येथे भारताच्या विविधतेचे दर्शन घडविणारे मिनी इंडिया पार्क उभारणी, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, डिजिटल शाळा, ग्रंथालय, युवकांसाठी जीम, नाट्यगृह, वन उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, स्वच्छतागृह, हॉकर्स प्लाझा, अशा विविध योजना राबविण्याचा संकल्प टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना टिंगरे म्हणाले, आपल्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात कोरोनामध्ये दोन वर्ष वाया गेली होती. त्यानंतर काही काळ विरोधातही बसावे लागले होते. तरीही महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ अडीच वर्षांमध्ये १५१० कोटींचा निधी मतदार संघामध्ये आणण्यात यश आले. लोहगाव येथील शंभर खाटांचे रुग्णालय पूर्ण झाले असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. लोहगाव पाणीपुरवठा योजना, नगर रस्त्यावरील व विश्रांतवाडी येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल यासारखी आणखी बरीच कामे येत्या काळात पूर्ण होत आहेत, असे टिंगरे यांनी सांगितले. अनेक प्रकल्पाची कामे सुरू आहेत, काही कामे सुरु होत आहेत. हे सर्व प्रकल्प पुढील पाच वर्षात पूर्ण करून वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे पुढील कार्यकाळात वडगावशेरी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होणार आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.