रमेश बागवे यांच्या जाहीरनाम्याचे दिमाखात प्रकाशन–या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर करावयाच्या अनेक योजना व विकासकामे याची ब्लू प्रिंट मी तयार केली आहे. रस्तारुंदीकरण, नवीन वाहनतळांची निर्मिती, पुरेशा दाबाने मुबलक पाणीपुरवठा, रस्त्यांवर दिवे, विपुल सार्वजनिक बससेवा, क्रीडांगणांचा विस्तार, जुन्या वाड्यांच्या विकासासाठी नवीन धोरण आखून निधी उपलब्ध करणे अशा नागरी सुविधांबरोबरच तरुण-तरुणीसाठी शाश्वत रोजगार, महिलांना सुरक्षा व सार्वजनिक स्वच्छतागृहे, व्यायामशाळांची उभारणी, ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांसाठी विरंगुळा केंद्रे अशा अनेक प्रकल्पांवर मी भर देणार आहे. जुन्या बाजाराचा विकास, तसेच घोरपडी, वानवडी, फातिमानगर, सॅलिसबरी पार्क अशा उपभागांसाठी विशेष विकास प्रकल्प राबवण्याचे मी योजले आहे. माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला हक्काचे घर त्याच जागी मोफत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच झोपडपट्टीवासीयांना ५५० चौरस फुटांचे घर मिळावे व मध्यमवर्गीयांच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मिळकतकर रद्द करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही रमेश बागवे यांनी दिली.
पुणे : पुणे कँटोन्मेंटच्या विकासाला गेल्या दहा वर्षांत खीळ बसली आहे. भाजपच्या दोन आमदारांना कँटोन्मेटच्या विकासासाठी निधी आणता आला नाही. ही परिस्थिती लवकरच बदलणार असून कँटोन्मेंटचा विकास आता थांबणार नाही. मी आमदार म्हणून विजयी होताच मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे सुरू होतील. कँटोन्मेंटचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी दिली.
पुणे कँटोन्मेंटच्या बदलासाठी मत, पुणे कँटोन्मेंटच्या विकासासाठी मत या रमेश बागवे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन गेली ४० वर्षे मी पुणे शहरात आणि विशेषतः पुणे कँटोन्मेंट परिसरात जनसेवेचे काम करत आहे. पुणे महानगरपालिकेचा दीर्घकाळ नगरसेवक, आमदार, गृहराज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करताना आपल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच जीवनध्येय मानून मी काम करत राहिलो. आपल्या सर्वांची मला मोलाची साथ लाभली, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अशीच साथ यापुढेही द्या, अशी भावना बागवे यांनी व्यक्त केली. आपण आशीर्वाद देऊन मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रात, राज्यात व पुणे महानगरपालिकेत गेली दहा वर्षे भाजपची सता असूनही कँटोन्मेंटच्या विकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जीवघेणी वाहतूक कोंडी, कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा, जुन्या घरांचा प्रश्न, अपुरे वाहनतळ, अपुरी सार्वजनिक बससेवा अशा नागरी प्रश्नांसोबतच महिलांची सामाजिक सुरक्षा, वाढती बेरोजगारी, गरिबांसाठी अपुरी आरोग्यसेवा, भाजीमंडई, रिक्षातळ, उद्याने यांची दुरवस्था असे अनेक प्रश्न जटिल झाले आहेत. कँटोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल (सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल) चा विकास व विस्तारही रखडला आहे. भाजपच्या निष्क्रिय आमदारांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे ही सारी बिकट परिस्थिती ओढावली आहे, अशी टीका बागवे यांनी केली.

