पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सरहद महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून मतदार जनजागृतीचे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम पार पडले. स्वीप टीमचे अधिकारी प्रा. शरदचंद्र गव्हाळे यांनी या उपक्रमांचे नियोजन केले.या कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) प्रणालींचा परिचय देत मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मतदार याद्यांमध्ये नावनोंदणी, ऑनलाईन सुविधांचा वापर, आणि मतदानाच्या प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सरहद महाविद्यालयाबरोबरच विविध महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लक्ष्मण लांडे, दिवटे सर आणि इतर सहकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
“मतदार जागृतीसाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने लोकशाही मजबूत होते,” असे निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी सांगितले. या कार्यक्रमांमुळे युवकांमध्ये आणि पालकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मकता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.