अमरावती -निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सामानाची झाडाझडती घेतली. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे राजकारण तापले आहे.
राहुल गांधी यांची शनिवारी अमरावतीत प्रचारसभा झाली. तत्पूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांचे हेलिकॉप्टर व सामानाच्या बॅगांची कसून तपासणी केली. त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओग्राफीही केली. राहुल यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याकामी मदत केली. यावेळी राहुल गांधी काही क्षण हेलिकॉप्टरजवळ थांबले. पण त्यानंतर ते तेथून आपल्या सभास्थानाकडे निघाले. यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना करतानाही दिसून आले.दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कारचाही आज महाराष्ट्रात तपासणी करण्यात आली. रेवंत रेड्डी शनिवारी नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. रस्त्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्या कारची झाडाझडती घेतली. या घटनेचाही व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राहुल गांधीच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. अमित शहा यांच्या बॅगांची कालच हिंगोलीत तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही प्रक्रिया निकोप व निष्पक्ष निवडणुकीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले होते.