मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पाडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजितदादाच्या गटाला दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली. यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जरी तो व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे अजित पवार गटाला सांगितले. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाने दिले.
यापूर्वी या प्रकरणावर बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करा, असेही न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला सांगितले होते.