मुंबई, १३ नोव्हेंबर : मलबार हिल परिसरातील उद्यानासाठी राखीव असलेली जागा व्यापारीकरणासाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेद्वारे घेण्यात आला होता. सदर निर्णयास येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची आज दखल घेतली. या मोकळ्या भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया थांबवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना लोढा यांनी आज पत्राद्वारे विनंती केली.
मुंबई महानगरपालिकेसारख्या नामांकित शासकीय संस्थेकडून राखीव भूखंडाचा व्यापारीकरणासाठी लिलाव करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. ज्या मूळ कारणासाठी सदर भूखंड आरक्षित आहे, त्या कारणासाठी तो वापरला जायला हवा. सदर भूखंडाच्या व्यापारीकरणसाठी नागरिकांनी देखील विरोध केला असून, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मागणीचा आदर करावा असे मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मलबार हिलमध्ये रमाबाई आंबेडकर मार्गाशेजारील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशन असलेला २४३२ स्क्वेयर मीटरचा प्लॉट खाजगी व्यापारासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता.