भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट
मुंबई- हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर महाविकास आघाडीने आत्ताच उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे बडे नेते संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी केली आहे. त्यावर मविआतील इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपसातील मतभेद विसरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात रान पेटवत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या मुद्याला हात घातला आहे.
संजय सिंह म्हणाले, महाविकास आघाडीने आत्ताच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करावे. त्यांनी या प्रकरणी विलंब केला तर त्यांचेच नुकसान होईल. हरियाणात तेच झाले होते. तिथे काँग्रेसमधील गटांनी एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यात काँग्रेसचे जबर नुकसान झाले. त्यामुळे मविआने कुणाचे आमदार जास्त येतील, या भानगडीत पडू नये. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस व मराठी स्वाभिमान या दोन्ही गोष्टी त्यांच्यासोबत जोडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर महाविकास आघाडीचा मोठा फायदा होईल असे मला वाटते.
भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट आहे. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीत जागा मिळूनही त्या घेतल्या नाही, असेही संजय सिंह यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीसोबत वाद सुरू आहे. कारण, त्यांनी त्यांच्या मुलाला हवी ती जागा सोडली नाही. त्यामुळे राज ठाकरे भाजपचे समर्थन करत असतील असे मला वाटत नाही. ते वेगवेगळी भूमिका घेत आहेत. मनसेमुळे मविआची काही मते कमी होतील, पण उद्धव ठाकरे यांच्या नावाची महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर मतांची हे विभाजन टाळता येईल, असे संजय सिंह म्हणाले.
भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केल्याची टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण सर्वांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अनेक योजना व प्रकल्प गुजरातला नेल्या. एका राज्याच्या विकासासाठी दुसऱ्या राज्याचे नुकसान करणे योग्य नाही. आतापर्यंत आपण दुचाकीचोर व इतर चोर पाहिले. पण भाजपने अख्खे पक्षच चोरले.
एवढेच नाही तर त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीसोबत संबंध असलेल्यांना आपल्यासोबत घेतले. त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या गोटात वळवले हे ही सर्वश्रूत आहे.
संजय सिंह यांनी यावेळी भाजपच्या एक है तो सेफ हैच्या घोषणेचाही समाचार घेतला. पंतप्रधान 10 वर्षांनंतर एक है तो सेफ हैचा नारा देत आहेत. एकाअर्थाने ते हिंदू समाजाला घाबरवत आहेत. त्यांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तु्म्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या. बटेंगे तो कटेंगे हा काय नारा आहे का? एकजूट राहिलो नाही तर संविधान संकटात येईल, आरक्षण संपुष्टात येईल. त्यामुळे एकजूट राहा आणि भाजपचे काम तमाम करा, असे ते म्हणाले.