इंडियाज बेस्ट डान्सर या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने स्वतः विकसित केलेल्या डान्स रियालिटी शोच्या चौथ्या सीझनमध्ये गेले काही महीने अटीतटीची स्पर्धा सुरू होती. या आणखी एका धमाकेदार सीझनवर आता पडदा पडला आहे आणि ग्रँड फिनालेमध्ये स्टीव्ह जिरवा या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात आले आहे. ग्रँड फिनाले ही जबरदस्त ऊर्जेने, अप्रतिम परफॉर्मन्सेसने भरलेली डान्स रजनी होती आणि या सीझनच्या संपूर्ण प्रवासाला साजेसा हा सोहळा होता, ज्याने भारताचा नवीन डान्स आयकॉन मिळवून दिला. होस्ट जय भानुशाली आणि अंकित चौहान तसेच परीक्षक करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांनी ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले. अंतिम फेरीतील हे स्पर्धक होते- स्टीव्ह जिरवा, हर्ष केशरी, नेक्स्टियन, नेपो, आकांक्षा मिश्रा म्हणजे अकीना आणि आदित्य मालवीय.
या फिनालेची शोभा आणखी वाढवण्यासाठी ‘झलक दिखला जा सीझन 11’ ची विजेती मनीषा रानी तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि शैल ओसवाल देखील उपस्थित होते. ‘रब्बा करे’ या आपल्या आगामी गीताचे प्रमोशन करण्यासाठी ते आले होते. तसेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होत असलेल्या ‘IBD व्हर्सेस SD: चॅम्पियन्स का टशन’ या अनोख्या डान्स रियालिटी शो मधील डान्स के पितामह- रेमो डिसूझा आणि परीक्षक मलाइका अरोरा आणि गीता कपूर यांनीही या भागात उपस्थित राहून आपल्या विनोदी टिप्पण्यांनी कार्यक्रमाची रंजकता वाढवली आणि प्रेक्षकांसाठी ते क्षण संस्मरणीय केले. ‘IBD व्हर्सेस SD: चॅम्पियन्स का टशन’ हा शो 16 नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 7.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.
स्टीव्ह जिरवा हा स्पर्धक इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 चा विजेता ठरला आणि त्याने ही प्रतिष्ठित ट्रॉफी पटकावली तसेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने 15 लाख रु. चे घसघशीत बक्षीस देऊन त्याचा गौरव केला, तर त्याचा कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया याला 5 लाख रु. चा धनादेश देण्यात आला. स्टीव्हने एक नवी कोरी मारुती सुझुकी स्विफ्ट देखील जिंकली. मारुती सुझुकी इंडिया लि.चे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. पार्थो बॅनर्जी यांच्या हस्ते त्याला हे बक्षीस देण्यात आले.
इंडियाज बेस्ट डान्सर मध्ये शिलॉँगहून आलेला स्टीव्ह जिरवा आणि कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया या जोडीचा प्रवास जबरदस्त होता. एकामागून एक प्रत्येक आठवड्याला ते परीक्षकांना आपल्या चपळ आणि अचूक फुटवर्कने मंत्रमुग्ध करून पूर्ण गुण मिळवत होते. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टीव्हला एका संकटाने ग्रासले होते आणि त्यामुळे त्याच्या चालण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. पण, त्याच्या आजीच्या निरंतर साहाय्यामुळे त्याचे जीवन पालटले आणि तो एक विलक्षण डान्सर बनू शकला. त्याच्या प्रतिभेने रेमो डिसूझाचे लक्ष वेधून घेतले. आपल्या चित्रपटाच्या संदर्भात स्टीव्हला भेटण्याची इच्छा रेमोने व्यक्त केली.