पुणे: खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम (EVM), व्हीव्हीपॅट (VVPAT), आणि ‘चक्रीका ॲप’च्या वापरासाठी आयोजित अंतिम प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात मतदान प्रक्रियेतील तांत्रिक कौशल्ये, नियमावली, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
या शिबिरात तहसीलदार किरण सुरवसे, मनपा उपयुक्त विजय नायकल, अधीक्षक विजय शिंदे, प्रमोद भांड, भूमेश मसराम, धम्मदीप सातकर, आणि निवडणूक विभागाचे अधिकारी सचिन आखाडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन साहीर सय्यद यांनी केले.
प्रशिक्षणात प्रा. तुषार राणे, संजय भोर,प्रा. पल्लवी जोशी आणि प्रा. माधुरी माने यांनी मतदान प्रक्रियेच्या विविध पैलूंवर सखोल माहिती दिली. प्रा. राणे यांनी ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले, तर प्रा. जोशी आणि संजय भोर यांनी मतदान प्रक्रियेत आवश्यक सुरक्षा उपाय स्पष्ट केले. प्रा. माधुरी माने यांनी ‘चक्रीका ॲप’चा वापर कसा करावा याबद्दल प्रशिक्षण दिले, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
‘चक्रीका ॲप’द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे निर्देश, आणि प्रक्रियेतील आवश्यक सूचना सहज मिळतात. मतदानाच्या वेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठीही हे ॲप उपयुक्त ठरते.
प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांची ५० गुणांची परीक्षा घेण्यात आली, ज्यातून त्यांचे ज्ञान तपासण्यात आले. या शिबिरामुळे कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे तांत्रिक ज्ञान मिळाले असून, आगामी निवडणुकीत हा अनुभव उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.