– केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभास्थळ पाहणी
पुणे, –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील सभा महाविद्यालय या ठिकाणी महायुतीची जाहीर प्रचार सभा संपन्न होणार आहे. या सभेकरीता एक लाख लोक उपस्थित राहतील यादृष्टीने महायुती प्रयत्नशील असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार आहे. सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर, शिवसेना नेते किरण साळी यांनी सभा स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी दोन सभा सोलापूर आणि पुणे या ठिकाणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये मोदींच्या सभेमुळे सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल. पंतप्रधान मोदी यांची सभा ही पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल .पुणेकर नेहमी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतास उत्सुक असतात ,त्यांच्या सभेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. भविष्यातील देशाची जडणघडण आणि महाराष्ट्रचे विकासा मधील योगदान याबाबत ते भाष्य करतील. पोलिसांनी देखील चांगल्या प्रकारे वाहतूक आणि गर्दी नियोजन व्यवस्था शहरात ठिकठिकाणी केलेली आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून यापैकी 18 मतदारसंघ सध्या महायुती सोबत असून यंदाच्या निवडणुकीत 21 पैकी 21 मतदार संघ महायुतीकडे येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे .
भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे म्हणाले, सभा स्थळी 71 हजार खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली असून मैदानाच्या परिसरात आणि बाहेर देखील स्क्रीन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तब्बल एक लाख लोक सभेसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.महायुतीचे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्व महायुती उमेदवार सभेस उपस्थित राहतील.m