बुलढाणा -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यात येईल. पण शिवराय हा शब्द उच्चारल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते. त्यांना ते सहनच होत नाही, असे ते म्हणालेत. भाजपला केवळ मतांसाठी शिवाजी महाराज हवे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.आणि सुरतेतही शिवरायांचे मंदिर बांधणार अशी घोषणाही केली .
उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी आहोत. पण दुसरीकडे महाराष्ट्र लुटणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. मागच्यावेळी आपल्याकडून एक चूक झाली. मी सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याविरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच चूक माझीच होती.
या लोकांना गेल्यावेळी मी उमेदवारी दिली होती. त्यानंतर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. मी त्या चुकीसाठी तुमची माफी मागतो. पण आता मी या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. ही चूक सुधारण्यासाठी मी येथे जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. आता विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले. हा शिवरायांचा पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावर त्यांनी दरोडा घातला. चोरी नव्हे अख्खा दरोडा घातला. 40 जणांच्या टोळीने दरोडा टाकून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचाच आहे. हे गद्दार, धोकेबाज व खोकेबाज लोक आहेत. पण आता 50 खोके नॉट ओके. त्यांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी भरपूर कमावले आहे. त्यांची घरे भरली. पण गरिबांची रिती झाली. त्यामुळे आता प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
बुलढाणा म्हटले की मातृशक्तीला वंदन केलेच पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे एक चांगले मंदिर बांधणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते, त्या सुरतेतही बांधणार आहे. का नाही बांधायचे? हे केवळ घंटा वाजवण्यासाठी व केवळ पळी – पंचपात्र घेऊन बसण्यासाठी नसेल. हे मंदिर आमचे संस्कारपीठ असेल.
देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आक्षेप घेत आहेत. कारण, शिवाजी महाराज की जय म्हटले की, त्यांच्या अंगाची आग होते. त्यांनी मला मुंब्र्यात मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. फडणवीस यांनी आमचा दाढीवाला गद्दार फोडून जो आपल्या डोक्यावर बसवला आहे, तो मिंधे ज्या जिल्ह्यातील आहे, त्याच जिल्ह्यात हे मुंब्रा आहे. फडणवीस यांनी हे लक्षात घ्यावे. मग तुम्ही अडीच वर्षे त्यांच्यासोबत अंडी उबवत बसला होतात का? ज्या जिल्ह्यातील तुम्ही मुख्यमंत्री केला, त्या जिल्ह्यात मंदिर बांधणे तुम्हाला अवघड वाटते का? आजही मुंब्र्याच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्पे उभी करण्यात आली आहेत. मग मंदिर महाराजांचे नाही तर काय मोदींचे बांधायचे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपला शिवाजी महाराज हे केवळ मतांची मशिन वाटते. हे गाजावाजत करत कुठेही पुतळे बांधतात. त्यांना मते मागण्यासाठी शिवाजी महाराज चालतात. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मालवण येथे महाराजांचा पोकळ पुतळा बांधला. त्यांचे प्रेम पोकळ व पुतळाही पोकळ. हे तेवढ्यावरच थांबले नाहीत. महायुतीचे सरकार आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. त्यांनी पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. अशुभ हातांनी केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही. त्यानुसार मोदींच्या हातांनी उभा केलेला पुतळा वर्षभराच्या आतच कोसळला.
आता हा पुतळा वाऱ्याने कोसळल्याचा कांगावा केला जात आहे. ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, तो किल्ला आजही समर्थपणे वादळ – वाऱ्यांना तोंड देत उभा आहे. पण आताच्या आधूनिक काळात उभा केलेला पुतळा कसा पडतो?
लोकसभा निवडणुकीत मशालीच्या प्रचारगीतात शिवाजी महाराजांचा उल्लेख होता. तो उल्लेख काढण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला. पण आम्ही तो उल्लेख वगळला नाही. आमचे काहीही झाले नाही. पण आता तुम्हा महाराजांचे नाव पुसण्यास निघालात. कोश्यारी महाराजांचा अवमान करून निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांनी महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यात घातला. हे पाहून महाराष्ट्राच्या हृदयात जखम झाली. म्हणून मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार असून, या मंदिरात त्यांनी दिलेली सर्वच शिकवण दिसून येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवराय म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते:सुरतेतही शिवरायांचे मंदिर बांधणार-उद्धव ठाकरे
Date:

