पुणे-माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात कर्वेनगर भागातून अटक केली. सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार शुभम लोणकर अद्याप फरार आहे.गौरव विलास अपुणे (वय 23, रा. कर्वेनगर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अपुणे याला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे. अपुणेच्या काही साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या हत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली. वारजे भागातील शुभम लोणकर हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येचा कट पुण्यात रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुभमचा भाऊ प्रवीण याला अटक करण्यात आली आहे.शुभम हा लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांच्या संपर्कामध्ये होता. त्याला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यावर तो पुन्हा बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. त्या वेळी अनमोल बिष्णोई याने त्याला सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली. काही रक्कम त्याला आगाऊ देण्यात आली होती, तसेच त्याला आणखी पैसे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार शुभम याने अन्य तिघा आरोपींशी संगनमत करून सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला. जुलै महिन्यापासून ते सिद्दिकी यांची हत्या करण्याच्या तयारीत होते. 12 ऑक्टोबर रोजी आरोपींनी वांद्रे भागात सिद्दिकी यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली.