पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 शांततेत व पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी पुणे विभागीय परिवहन कार्यालयाला व पोलिसांना आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी खास सूचना दिल्या आहेत.
- वाहन तपासणीवर कडक नियंत्रण: उमेदवारांच्या वाहनांमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन विभागाला त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या वाहनांवर कडक निरीक्षण ठेवून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाईल.
- संवेदनशील भागात पेट्रोलिंग वाढवणे: मतदारसंघातील झोपडपट्टी व गर्दीच्या भागांत पोलिसांनी नियमित पेट्रोलिंग वाढवून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे संभाव्य तणाव टाळता येईल.
- एक खिडकी कक्ष विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन: एक खिडकी कक्षाद्वारे दिलेल्या परवानग्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी फ्लायिंग स्क्वाड टीम आणि स्टॅटिक सर्विलन्स टीमला निरीक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार किरण सुरवसे आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे उपस्थित होते.