मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी सुरू झाली आहे. आजची सुनावणी सुमारे पाऊन तास झाली. तर पुढील सुनावणी शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अजित गटाने चुकीची शपथपत्रे दाखल केले आहेत.अजित पवार गटानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी ९ हजार प्रतिज्ञापत्र बोगस आहेत. मृत व्यक्ती, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, एलआयसी एजंट, जिल्ह्यात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्र दिली आहेत, हा गैरप्रकार असल्याचं सिंघवी म्हणाले. एकाही प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना नेता मानताना शरद पवार यांना नेता मानत नसल्याचं म्हटलेलं नाही. अजित पवार गटाची याचिका ही चुकीची असल्यानं फेटाळली जावी, असा युक्तिवाद केल्याचं सिंघवी यांनी सांगितलं. आता या प्रकरणी २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचं सिंघवी म्हणाले.अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांना प्रताप चौधरी यांची ओळख करुन दिली. अजित पवार गटानं २६ ऑक्टोबरच्या सुनावणीत प्रताप चौधरी हे त्यांना समर्थन करत असल्याचं म्हटले. त्यांना हे माहिती मिळाल्यानंतर ते निवडणूक आयोगात आले आणि शरद पवार यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं. प्रताप चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत, असं अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं. शरद पवार हे माझे नेते असल्याचं प्रताप चौधरी म्हणाले.अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की निवडणूक आयोगानं अजित पवार गटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, त्यांना ते अधिकार आहेत, असं सांगितलं आहे. अजित पवार गटाची याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद केल्याचंही ते म्हणाले.
अजित गटाने खोटे शपथपत्र सादर केल्याचा अभिषेक मनु सिंघवींचा आरोप; पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला
Date:

