पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मायक्रोऑबझर्व्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षण कक्षातर्फे करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मायक्रोऑबझर्व्हर्सना त्यांच्या जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेची माहिती तसेच आवश्यक कौशल्यांची शिकवण दिली जाणार आहे.
मायक्रोऑबझर्व्हर्स निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मतदारांना कोणतीही असुविधा न होता सुरक्षित व पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवली जावी, यासाठी मायक्रोऑबझर्व्हर तैनात केले जातात. मतदान केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक बाबींवर ते बारीक लक्ष ठेवून, नियमांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम करतात. निवडणूक दरम्यान कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत असल्यास त्वरित अहवाल देणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे.
या प्रशिक्षण सत्रात प्रा.तुषार राणे व प्रा. माधुरी माने हे मायक्रोऑबझर्व्हर्सना तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्यांचे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान मतदान यंत्रणांची तपासणी, मतदारांची पडताळणी, मतदान प्रक्रियेतील नियमांचे पालन, आणि निवडणुकीच्या शिस्तीची माहिती दिली जाईल.
मनुष्यबळ विभागाचे सहाय्यक अधिकारी साहीर सय्यद यांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, “मायक्रोऑबझर्व्हर्स निवडणूक प्रक्रियेचे एक महत्त्वाचे अंग असून त्यांच्या प्रशिक्षिततेवरच निवडणुकीची पारदर्शकता व यशस्वीता अवलंबून आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या प्रशिक्षणामुळे खडकवासला मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुलभ व पारदर्शकतेसाठी एक पाऊल पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.