मुंबई-अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खाननं माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचं सांगत धमकी देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. न दिल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गॅग आजही सक्रिय आहे. असा धमकीवजा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सोमवारी मध्यरात्री आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरु आहे.