भाजपा नेतृत्वाशी चर्चेनंतर उमेदवारी मागे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर
पुणे, ता. ४ ः शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे मुसळे यांनी सोमवारी (ता. ४) उमेदवारी मागे घेतली. मुसळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असा विश्वास या वेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.
मधुकर मुसळे हे भाजपाचे समर्पित कार्यकर्ते असून, त्यांनी स्मार्ट औंध साकारण्यासाठी अथकपणे काम केले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक वर्षे भाजपाच्या मुशीत वाढलेल्या मुसळे यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी नगरसेवकपदापर्यंत मजल मारली होती. तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यात ते नेहमी पुढे असतात. तसेच औंध परिसर स्मार्ट बनविण्यासाठी अनेक कल्पक योजना कागदावरून प्रत्यक्षातआणण्यासाठी त्यांनी हिरिरीने प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सोमवारी मुसळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे वातावरण निवळले असून, आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार करणार असल्याचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी स्पष्ट केले.
मधुकर मुसळे हे पक्षाचे जुने-जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी मी, ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे, त्या संस्कारांचे परिपूर्ण पालन करीत मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यासोबतच राज्यात महायुतीची सत्ता यावी, यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद!
- सिद्धार्थ शिरोळे, भाजपा उमेदवार, शिवाजीनगर मतदारसंघ